Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आणि मनसे (MNS) विजयी मेळावा काढणार आहेत. वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे.
शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब,वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आजच्या सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय?
हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने एल्गार पुकारल्याने सरकारने गुडघे टेकत शासकीय आदेश मागे घेतला. मराठी माणसाच्या एकजुटीचा हा प्रचंड विजय असून 5 जुलैला मराठी विजय दिवस साजरा केला जाणार आहे. वरळी येथील डोम सभागृहात हा विजयोत्सव होणार असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
मराठी ताकद एकत्र येऊ नये हा सरकारचा कुटील डाव- उद्धव ठाकरे
पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही जीआर राज्य सरकारनं मागे घेतले. दोन्ही ठाकरे बंधूंचा हा एकत्रित विजय असल्याची सर्वत्र चर्चा आहे. आणि त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र 5 जुलैला विजयी मेळावा देखील साजरा करणार आहेत. दरम्यान जीआर रद्द झाला असले तरी आता नवीन राजकारण सुरू झालंय. मराठी ताकद एकत्र येऊ नये हा सरकारचा कुटील डाव होता. आणि म्हणूनच जीआर रद्द करावा लागला, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊ नये, असा कोणताच जीआर काढला नव्हता अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 01-07-2025














