मंडणगड : देशातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्ष जनजाती गौरव वर्ष साजरे करत असताना यानिमित्ताने राबवण्यात येणारे हे अभियान केंद्र सरकारची महत्वाकांशी अभियान म्हणून याकडे पाहिले जाते. या अभियानास मंडणगड-तिडे आदिवासी वाडीतून सुरवात झाली आहे.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, उपजीविका व सांस्कृतिक सन्मान प्रदान करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा व आदिवासी समाजास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश आहे.
तिडे आदिवासीवाडीमध्ये या अभियानाला १६ जूनपासून सुरवात करण्यात आली. अभियानात गाव पातळीवर थेट शिबिरे आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभआदिवासी लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहचवण्याचे काम सद्या तालुक्यातील शासकीय विभागांच्या वतीने सुरु आहे. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह हे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. सहअध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, तर तालुकास्तरीय अध्यक्ष दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, सहअध्यक्ष मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे व सदस्य सचिव म्हणून प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग, पेण हे कामकाज पाहणार आहेत.
तिडे आदिवासीवाडीतील सर्व आदिवासी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी केले आहे. या योजनेमध्ये केवळ शासकीय दाखले देणेच नसून विविध योजनांच्या माध्यमातून घरे, पाणी व्यवस्था, रस्ते, वीज अशा भौतिक सुविधांबरोबरच शिक्षण, रोजगार, डिजिटल उपक्रम, कौशल्य विकास सुविधांचा या योजेनेमध्ये समावेश आहे.
शासनाच्या सबंधित विविध योजना तिडे आदिवासी वाडी येथे राबवण्याचे काम सद्या सुरु आहे. आदिवासी समाजास विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे व या समाजाचे सक्षमीकरण करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्याकरिता महसूल विभागासह सबंधित सर्व विभाग प्रयत्नशील आहेत- अक्षय ढाकणे, तहसीलदार, मंडणगड.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 01/Jul/2025














