रत्नागिरी : कोकणवासी समृद्ध आहेत. आपल्या प्रत्येक गावाचा इतिहासाशी संबंध जोडलेला आहे. राजीव लिमये यांनी कर्ला गावातील लोकांचे मन जाणून घेतले, माणसाशी नाळ जुळल्याने ते लिहू शकले. कोतवड्याचे पटवर्धन, कल्यांचे खासगीवाले लिमये, नेवऱ्याचे खेर-गोविंदपंत बुंदेले आणि बसणीचे विसाजीपंत लेले, बसणीतील सर्कसवाले विष्णुपंत छत्रे अशी इतिहासाशी अनेक नावे जोडली आहेत. या व्यक्ती बाहेर जाऊन मोठ्या झाल्या. ते गावात परतले नाहीत; पण हे सर्वजण राष्ट्रप्रेमी होते म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या गावाबद्दल लिहिले तर मोठा इतिहास तयार होईल, असे प्रतिपादन चिपळूणच्या लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले.
लिमये यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व्यंकटेश हॉटेलमध्ये झाले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. विलास पाटणे, रवींद्र सामंत, बाळ माने, राजाभाऊ लिमये, प्रमोद कोनकर उपस्थित होते. अॅड. पाटणे यांनी सांगितले, आयुष्यात एकतरी पुस्तक लिहावे. लोक चांगल्या साहित्याच्या शोधात असतात. माणसं दुरावत चालली असताना खेडेगावातच माणसे एकमेकांना सांभाळून घेतात. गावात माणुसकी शिल्लक आहे. माणसाचे अस्सलपण शिल्लक आहे, असे दिसते व लिमये यांचे पुस्तक वाचताना निसर्गाच्या जवळ गेल्यासारखे भासते.
पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन अनिकेत कोनकर, मुग्धा लिमये व सहावीतील स्पृहा भावे हिने केले. वरूण लिमये आणि श्रेया लिमये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तेजश्री भावे यांनी सूत्रसंचालन केले.
कोणालाही आपला गाव प्रिय असतोच. निवृत्तीनंतर समाजमाध्यमांत लिहायला सुरुवात केली. साठीच्या वयात मन भावनाप्रधान झाले. जुन्या आठवणी आठवत गेल्या तसे लिहित गेलो. आज इथे असलेल्या सुप्त लेखकांनी लिहायला सुरुवात करावी. कॉर्पोरेट व औद्योगिक इतिहासाविषयी लेखन झाले पाहिजे तसेच समाजातील विविध परंपरा, कोकणातले रंग लिहावे. ग्रामीण संस्कृती, गावपण जपण्यासाठी लिखाण करा. कोकणातले भावबंध जपले पाहिजेत-राजीव लिमये, लेखक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 01/Jul/2025














