चिपळूण : देवराईच्या पुनरुज्जीवनासाठी बळीराजा ग्रामपरिवर्तन फाउंडेशनतर्फे वृक्षांची लागवड

चिपळूण : बळीराजा ग्रामपरिवर्तन फाउंडेशनच्या पुढाकाराने व स्थानिक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून सोमवारी तालुक्यातील वारेली येथे देवराई पुनर्जीवनाचा महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, उंबर, बेल, बकूळ, निरफणस, शेवरी, भेला, चिंच, आवळा, कदंब, बदाम, कांचन, जारूळ, मोहगणी, शमी, करंज, जांभूळ अशा २००हून अधिक स्थानिक, औषधी व पारंपरिक झाडांची लागवड करण्यात आली.

गावातील मंदिर परिसरातील पारंपरिक देवराई सांभाळून ती पुन्हा जिवंत करण्याचा व भविष्यातील पिढ्यांतील निसर्गाचे संवर्धन करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. फाउंडेशनच्या स्वयंसेवकांसह युवक, महिला मंडळं, ज्येष्ठ नागरिक यांचा मोठा सहभाग या उपक्रमात पाहायला मिळाला, प्रत्येक वृक्षाची नावे, त्यांचे फायदे आणि महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले गेले.

देवराई म्हणजे गावाचा प्राण. ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर जैवविविधतेचा खजिना आहे. हा उपक्रम पुढे चालू ठेवत दरवर्षी अशी झाडांची लागवड करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने अशा उपक्रमासाठी इच्छुकांनी बळीराजा ग्रामपरिवर्तन फाउंडेशनशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 01/Jul/2025