रत्नागिरी : जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी इच्छुकांनी २० जुलैपर्यंत अर्जासह संच सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू (पुरुष, महिला आणि दिव्यांग), गुणवत्तापूर्ण क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा सेवक यांच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन वर्षांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी अर्ज व आवश्यक माहितीचा संपूर्ण संच दिनांक २० जुलैपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, बाफना मोटर्सजवळ, एमआयडीसी, मिरजोळे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख १० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. खेळाडू (पुरुष व महिला) / दिव्यांग खेळाडू (पुरुष किंवा महिला) / क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरिता त्या त्या पुरस्कार वर्षातील १ जुलै ते ३० जून पर्यंतची कामगिरी / कार्य ग्राहय धरले जाईल. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी धनुर्विद्या (आर्चरी), मैदानी क्रीडा स्पर्धा (अॅथलेटिक्स). बॅडमिंटन, बिलियर्डस अँड स्नुकर, कॅरम, बुद्धिबळ (बेस), सायकलिंग, तलवारबाजी (फेन्सिंग), गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, अश्वरोहण (हॉर्स रायडिंग), लॉन टेनिस, मल्लखांब, नेमबाजी, स्केटिंग, स्क्वॅश, जलतरण (स्विमिंग, डायव्हिंग, वॉटरपोलो), टेबलटेनिस, ट्रायथलॉन, आट्यापाट्या, बास्केटबॉल, शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग), मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग), क्रिकेट, फुटबॉल, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कयाकिंग / कॅनोईंग, खो-खो, भारोत्तोलन (पॉवरलिफ्टिंग), रोईंग, तायक्वाँदो, व्हॉलीबॉल, वजन उचलणे (वेटलिफ्टिंग), कुस्ती (रेसलिंग), वुशू, यॉटींग, सॉफ्टबॉल, रग्बी, मॉडर्न पेंटॅथलॉन, बेसबॉल, स्पोर्ट क्लाइंबिंग या खेळांचा विचार केला जाईल.

पुरस्काराचे थोडक्यात निकष असे : गुणवंत खेळाडू: या पुरस्काराअंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यामध्ये खेळाडूने पुरस्कार वर्षांसह लगतपूर्व ५ वर्षांपैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनधित्व केले असले पाहिजे. खेळाडूंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धामधील पुरस्कार वर्षाच्या लगतपूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरिष्ठ/कनिष्ठ, शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी लक्षात घेण्यात येईल. यापैकी उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल. खेळाडूने त्याचा अर्ज विहित नमुन्यात व विहित मुदतीत या कार्यालयात सादर करावा. खेळाडूने स्पर्धांच्या मुळ प्रमाणपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती सोबत सादर करणे आवश्यक राहील. खेळाडूंचा अर्ज अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत शिफारास करून सादर करणे आवश्यक राहील. तथापि अपवादात्मक परिस्थितीत खेळाडू वैयक्तिकरित्या अर्ज करू शकतील. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष वास्तव्य असले पाहिजे.

दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा स्पर्धास्तर पुढील प्रमाणे : ज्युनि. वर्ल्ड पैरा अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई पॅरा अजिंक्यपद स्पर्धा (कनिष्ठ गट), कॉमनवेल्थ पॅरा अजिंक्यपद स्पर्धा (कनिष्ठ गट), वरिष्ठ पैरा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, कनिष्ठ पॅरा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा / वरिष्ठ पॅरा राज्य अजिंक्यपद स्पर्धा, कनिष्ठ पॅरा राज्य अजिंक्यपद स्पर्धा, कनिष्ठ / वरिष्ठ पैरा जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा.

एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, जागतिक अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा (वरिष्ठ गट), जागतिक चषक क्रीडा स्पर्धा (वरिष्ठ गट), आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट), राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट), यूथ ऑलिंपिक गेम्स, युथ कॉमनवेल्थ गेम्स, युथ जागतिक अजिंक्यपद / युथ जागतिक चषक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूस जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 01/Jul/2025