गावतळे : दापोली सायकलिंग कल्बचे दोघे जण आणि मुंबईतील एकूण आठ सायकलस्वारांनी हरिद्वार ते केदारनाथ असा ६०० किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. हा अनुभव बरेच काही शिकवणारा होता, कच्च्या रस्त्यावर सायकल चालविताना अन् सर्वाधिक उंचीवर श्वास घेताना स्वारांचा कस लागला. सायकलने प्रवास करा, निरोगी राहा, असा संदेश यावेळी सायकलवीरांनी दिला.
हिंदूच्या चार पवित्र अशा धामांपैकी एक असलेले केदारनाथ हे सर्वांत उंचीवर वसलेले ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात असून, मंदिर समुद्रसपाटीपासून २५८४ मीटर उंचीवर हिमालयातील गढ़वाल प्रदेशामध्ये येते. येथे पोहोचण्यासाठी १७ कि.मी.चे खडतर ट्रेकिंग करावे लागते. या सायकलवीरांनी १२ ते २४ जून या कालावधीत हरिद्वार ते केदारनाथ हा ६००हून अधिक किमीचा सायकल प्रवास केला.
केदारनाथ आणि इतर अनेक धार्मिक, आध्यात्मिक स्थळांना भेटी दिल्या, सायकलप्रवासात पुरेल एवढे साहित्य प्रत्येकाने आपापल्या सायकलवर घेतले होते. त्यासाठी कोणतेही वेगळे वाहन वापरण्यात आलेले नाही. या प्रवासात दापोली सायकलिंग क्लबचे अंबरिश गुरव, शरद गुरव तसेच मुंबईतील सतीश जाधव (वय ६८), विजय कांबळे, विशांत नवार, नवनीत वरळीकर, विकास कोळी, आदित्य दास सहभागी झाले होते.
या ठिकाणांस दिल्या भेटी
शेकडो कि.मी.च्या सायकल प्रवासात या सायकलिस्टनी हरिद्वार, ऋषिकेश, शिवपुरी, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग, कीर्तीनगर, गुप्तकाशी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिर, महाकवी कालिदास यांना विद्या प्राप्त झालेले महाकाली मंदिर कालीमठ या ठिषाणांना भेट दिली तसेच हिवाळ्यात केदारनाथ मंदिर बंद झाल्यावर देवाच्या मूर्ती ज्या ठिकाणी आणल्या जातात ते उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिर, अगस्त्य ऋषींची तपोभूमी, अगस्त्यमुनी, गौरीकुंड, केदारनाथ धाम आदी शंकराचार्य समाधी, शिवपार्वती यांचे लग्न झालेले ठिकाण त्रियुगी नारायण, चारीदेवी मंदिर श्रीनगर इत्यादी अनेक ठिकाणे पाहिली. गंगानदीत रिव्हा राफ्टिंग पण त्यांनी केले. अनेक स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला.
देवभूमी हिमालयातील उत्तराखंड गढ़वाल भागातील डोंगर निसर्ग अनुभवत, गंगा, अलकनंदा, मंदाकिनी नदीच्या किनाऱ्याने सायकल चालवणे खूपच आव्हानात्मक आहे. रस्त्यावर आलेल्या दरडी त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी. थंडी. वारा, पाऊस, न संपणारे घाटरस्ते, तीव्र चढ़-उतार, मार्गावरील चिखल, बर्फाचे ग्लेशियर अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. हिमालयात सायकल चालवण्याचा अनुभव येथे कामी आला. पथकाचा सराव, एकजूट आणि मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून झालेले स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी, निसर्गाची अपार सुंदरता, आध्यात्मिक वातावरण यामुळे ही सायकल यात्रा संस्मरणीय ठरली. पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व आम्ही पटवून दिले. हा अनुभव खूपच आनंददायी होता. – अंबरिश गुरव, दापोली सायकलिंग क्लब
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 01/Jul/2025














