दारुड्याचा धुमाकूळ! वाढदिवसाहून परतणाऱ्या महिलेला बेदम मारहाण; पतीलाही धक्काबुक्की

दापोली, [३० जून, २०२५]: दापोली तालुक्यातील आसोंड, रोहिदासवाडी येथे एका महिलेला वाढदिवसाच्या कार्यक्रमाहून घरी परतत असताना दारुड्या इसमाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिलेचा पतीही जखमी झाला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्नेहल सुधीर मुरुडकर (रा. आसोंड, रोहिदासवाडी) या त्यांच्या जाऊ सविता पांडुरंग मुरुडकर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून आपल्या मुलीसोबत रस्त्याने घरी जात होत्या. त्याचवेळी आरोपी मंगेश बाळाराम मुरुडकर (रा. आसोंड, रोहिदासवाडी) हा दारुच्या नशेत तेथे आला. त्याने कोणताही कारण नसताना स्नेहल मुरुडकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या प्रकारानंतर आरोपी मंगेशने रस्त्याच्या बाजूला पडलेली बांबूची काठी घेऊन स्नेहल मुरुडकर यांच्या डाव्या कमरेवर मारहाण केली, ज्यामुळे त्यांना मुक्का मार लागला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांचा उजवा हात पिरगाळून त्यांना ढकलून दिले. यावेळी स्नेहल यांचे पती सुधीर मुरुडकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी मंगेशने त्यांनाही हाताने मारहाण केली.

या घटनेनंतर स्नेहल सुधीर मुरुडकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला. त्यांच्या फिर्यादीवरून दिनांक ३० जून २०२५ रोजी रात्री ७ वाजता गु.र.नं. १२४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:20 01-07-2025