चिपळूण, [३० जून, २०२५]: चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील बोया फाटा परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका ६४ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून, सुमारे २१०० रुपये किमतीची २० लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दिनांक ३० जून २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मार्गताम्हाणे, बोया फाटा येथे एका झाडाखाली अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळ रमेश पालकर यांनी आपल्या पथकासह छापा टाकला.
या छाप्यात अनिल विठ्ठल गुरव (वय ६४, रा. तनाली, गरववाडी, ता. चिपळूण) हा व्यक्ती आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून २० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि ती ठेवलेली कॅन असा एकूण २१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी, दिनांक ३० जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३६ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४६/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई सुरू ठेवली असून, अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 01-07-2025














