कोकणच्या सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा : खासदार सुनील तटकरे यांची केंद्राकडे मागणी

रत्नागिरी : कोकणच्या समुद्रकिनाऱ्याहून जाणाऱ्या सागरी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी मी केंद्र शासनाकडे करणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला; परंतु यावर्षी देखील या महामार्गाचे काम होणार नाही ही सत्यता नाकारता येत नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. क्षमता नसताना एका एका ठेकेदाराने जलजीवन मिशनमधील अनेक कामे घेतली. त्यामुळे बहुतांशी काम अपूर्ण आहेत. शासनाची अडवणूक करणाऱ्या अशा ठेकेदारांना काळ्या

यादीत टाकण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव उपस्थित होते. तटकरे म्हणाले, जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समिती म्हणजे दिशा समितीची बैठक यापूर्वीच होणार होती; परंतु विमान दुर्घटनेमध्ये घरातील जवळचा व्यक्ती गेल्यामुळे ती बैठक रद्द करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. आज ही बैठक घेण्यात आली; परंतु या समितीला आमदार उपस्थित राहू शकले नाहीत कारण, त्यांचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. या बैठकीमध्ये जलजीवन मिशन, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, महावितरण कंपनी, पंतप्रधान ग्रामसडक योजना, वयोश्री योजना, लाडकी बहीण योजना आदींचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या आराखड्यामध्येच अनेक त्रुटी आहेत. निधी नाही म्हणून कामं थांबली नाहीत. क्षमता नसताना एका ठेकेदाराने चार ते आठ कामे घेतली आहेत. यामुळे योजनेतील अनेक कामे अपूर्ण आहेत. भविष्यात निधी आला, तर ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे; परंतु जास्त काम घेऊन अडवणूक करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचा आढावा घेतला. रायगडपासून अगदी संगमेश्वरपर्यंत बरेच काम झाले आहे; परंतु संगमेश्वरपासून पुढे लांजापर्यंत हे काम रखडले आहे. त्याबाबत ठेकेदारांना सूचना केल्या आहेत. पुलांमुळे जिथे कामे रखडली आहेत त्या भागात सर्व्हिस रोड चांगले करून देण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत; परंतु यावर्षी या महामार्गाचे काम होणार नाही ही सत्यता मात्र नाकारता येत नाही, असेही तटकरे यांनी कबूल केले.

अपंगांच्या तपासणीसाठी शिबिरे घ्या
जिल्ह्यातील अपंगांवरील उपचारामध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था दिसून येते. या अपंगांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालय स्तरावर तपासणी शिबिर घेण्यात यावे. अपंगांना मदतीचा हात देणे, हा या मागचा उद्देश आहे. वृद्धांसाठीच्या वयोश्री योजनेचाही जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे तटकरे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 01/Jul/2025