साखरपा : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देवळे घाट वाहतुकीस धोकादायक ठरणार आहे. अनेक ठिकाणी माती ढासळलेली असल्याने या परिसरातून वाहने नेणे असुरक्षित झालेले आहे तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या चौपदरीकरणामुळे रस्त्यावर अडथळे निर्माण होत आहेत.
मिऱ्या-नागपूर देवळेफाट्यापासून महामार्गावरील दाभोळे गावापर्यंत असलेला घाट हा देवळे घाट म्हणून ओळखला जातो. अवघा साडेतीन किलोमीटरचा हा घाट आहे. या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. देवळे फाट्यानजीक जुन्या रस्त्याच्या कडेला डोंगरात जेसीबीने खोदकाम केले जात आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर डोंगरतील माती रस्त्यावर येऊन साचलेली आहे. सर्वत्र चिखल होत आहे तसेच काही ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर येण्याचा मोठा धोका आहे. पाच ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तिथे रस्त्त्यांचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक जुन्या रस्त्याने चालू केली आहे. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे त्यामधून आले चालवताना चालकांची मोठी पंचाईत होत आहे.
दाभोळे गावाच्या बाहेरून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी काजळी नदीवर लांजा रस्त्याच्यावरून पूल बांधण्याचे काम सुरू आहे. हे कामही गेल्या दीड वर्षापासून अपूर्णच आहे. पुलाच्या खांबाचे काम दीड वर्षापासून सुरू असले तरीही ते अद्याप अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे या परिसरातही रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर घाटपरिसरात पावसाळ्यामध्ये वाहने चालवणे अडचणीचे होत आहे. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झालाच तर आंबा व देवळेघाट परिसरात वाहने चालवताना त्रासदायक होणार आहे. या परिसरातील धोक्याच्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात आणि सूचना फलकही लावण्यात यावेत. –गुरु सावंत, वाहनचालक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:55 PM 01/Jul/2025














