पुलांसह रस्ते देखभालीसाठी २४ तास सतर्क रहा : मंत्री योगेश कदम

खेड : मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास पुलांसह रस्त्यांना धोका पोहचून अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दरडप्रवण क्षेत्रासह घाट सतत निगरानीखाली ठेवून पूल व रस्त्यांच्या देखमालीबाबत २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शासकीय यंत्रणांना दिल्या. तसेच कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबीही दिली.

तालुका दौऱ्यावर आले असता येथील तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्तीविषयक आपत्ती व्यवस्थापन बैठकीत त्यांनी मान्सून काळात नैसर्गिक आपत्तीविषयक तयारी व सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेतला. नियोजनबद्ध आपत्ती व्यवस्थापनासाठी गाव व तालुका पातळीवर सर्व शासकीय कार्यालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवून शासकीय यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या.

जगबुडी व नारंगी नदीतील उपसण्यात आलेल्या गाळाबाबत माहिती घेत पाऊस थांबल्यानंतर पुन्हा या नद्यांतील गाळ उपसण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्याही सूचना दिल्या, दरडप्रवण व घाट याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करून कोणतीही आपत्ती उद्भवल्यास यंत्रणांना सज्ज राहण्याबाबतही सूचित करण्यात आले. यावेळी आपत्तीच्या काळात जनतेच्या सोयीसाठी तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी दिली.

याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय कदम, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, पोलीस निरीक्षक नितीन भोयर, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 01/Jul/2025