रघुवीर घाटात मध्यरात्री कोसळलेली दरड हटवली

खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणाऱ्या रघुवीर घाटात मध्यरात्री दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती; परंतु सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावरील दरड हटवण्यात यश आले. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील आकल्पे येथे लोकवस्तीची एसटी बस सकाळी खेडसह खोपी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन माघारी परतली.

पावसाचा जोर ओसरला असला, तरीही अधूनमधून वेगवान वाऱ्यासह जोरदार सरी पडून जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे डोंगर भागातील वहाळ आणि झरे प्रवाहित झाले आहेत. डोंगरातील माती सैल झालेली असून, ती खाली येण्याची भीती आहे. काल मध्यरात्री रघुवीर घाटात दरड कोसळून दगड-माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरू होणे अशक्य होते. पहाटेची वेळ असल्याने ग्रामीण भागातील लोकांचा राबता या मार्गावर कमी असतो; परंतु सकाळी आकल्पेहून लोकवस्तीची एसटी बस प्रवासी घेऊन खेडकडे येते. त्या गाडीला विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. तसेच खासगी कामांसाठी येणारे, दूध व भाजीपाला विक्रेतेही या बसमधून येत असतात. त्यांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान, दरड कोसळल्याची माहिती सकाळी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्याचे काम तत्काळ हाती घेतले. सुरुवातीला मोठ दगड बाजूला काढण्यात आले. त्यानंतर रस्त्यावरील माती काढून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. हे काम काही तासातच पूर्ण करण्यात आले. त्यामुळे सकाळी खेडकडे जाणारी वस्तीची एसटी बस वेळेत रवाना झाली. पावसाळ्यापूर्वी दरड किंवा तत्सम आपत्तीला सामोरे जाण्यासाठी बांधकाम विभागाने तयारी करून ठेवल्यामुळे हे शक्य झाले. ‘दरवर्षी पावसाळ्यात रघुवीर घाटात दरड कोसळत असल्यामुळे कांदाटी खोऱ्यातील २१ गावांचा संपर्क तुटतो. यंदा खेड तालुक्यातील दरडग्रस्त भागांवर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळेच रघुवीर घाटात दरड कोसळूनही जास्त काळ वाहतूक ठप्प राहिली नाही’, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे शिंदी, वळवण, उचाट, मोरणी, म्हाळुंगे, सालोशी, खांदाट, वाघावळे, लामज, निवळी, परबत, बन, चकदेव, आकल्पेसह अन्य गावांकडे जाण्याचा मार्ग सद्यःस्थितीत धोकादायक बनला आहे. यापुढे दरड कोसळल्यास या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे- सदानंद मोरे, ग्रामस्थ, शिंदी-वळवण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 02/Jul/2025