राजापूर नगरपालिकेने पकडलेल्या गुरांकडे मालकांची पाठ

राजापूर : गेल्या काही वर्षांपासून राजापूरवासीयांची डोकेदुखी ठरलेल्या मोकाट गुरांच्या समस्येबाबत नागरिकांतून ओरड झाल्यानंतर राजापूर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. पाच मोकाट गुरांना ताब्यात घेतले. मात्र, त्याला आठवडाभराचा कालावधी उलटला तरी गुरांच्या मालकांनी ती सोडवून नेलेली नाहीत. त्यामुळे मालकच जनावरांबाबत बेफिकीर असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

नगरपालिकेशी संपर्क साधून संबंधित गुरांच्या मालकांनी आपली जनावरे सोडवून न्यावीत, अन्यथा ४ जुलैनंतर ताब्यात असलेल्या जनावरांचा कधीही लिलाव करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राजापूर शहरात मोकाट जनावरांच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बिनदिक्कत फिरणारी आणि रात्रीच्या वेळी रस्त्यात ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांच्या टोळक्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत होती. त्यामुळे पालिकेने गेल्या आठवड्यात फिरणाऱ्या असंख्य गुरांपैकी केवळ पाच मोकाट गुरांना ताब्यात घेतेले आहे. या सर्व गुरांना पालिकेच्या मालकीच्या जीर्ण विश्रामगृहात ठेवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 02/Jul/2025