चिपळूण : वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांनी एका दुर्मीळ आणि जीवघेण्या आजाराचे निदान करून यशस्वी उपचार केले आहेत. या आजाराचे नाव स्पॉन्टेनियस सेरेब्रोस्पायनल फ्लूइड (CSF) रायनोरिया असून, यामध्ये मेंदूतील पाणी नाकावाटे गळ लागते.
एका महिला रुग्णाने (वय ४४, चिपळूण) ईएनटी ओपीडीमध्ये १५ दिवस सतत नाकातून पाणी गळण्याची तक्रार सांगितली. सुरुवातीला सर्दीचे लक्षण असल्याचे समजून त्यांनी दुर्लक्ष कैले होते; मात्र तपासणीदरम्यान सहायक प्रा. डॉ. राजीव केणी यांनी गंभीरतेची जाणीव करून दिली. हा आजार डोकेदुखी, चक्कर येणे अशा त्रासांना कारणीभूत ठरू शकतो आणि नाकातील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण करतो. त्यामुळे तातडीने उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. केणी यांनी सांगितले. या निदानानंतर रुग्णाला तत्काळ मेंदू शस्त्रक्रिया विभागाकडे पाठवण्यात आले.
प्रमुख मेंदू शल्यचिकित्सक डॉ. मृदुल भाटजीवाले यांनी रुग्णाची सखोल तपासणी करून तातडीने उपचार व शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. भाटजीवाले यांनी सीटी सिस्टर्नोग्राम ही विशिष्ट प्रक्रिया केली. या प्रक्रियेत रुग्णाच्या पाठीमधून मेंदूच्या द्रवामध्ये रंगद्रव्य (डाय) सोडले जाते आणि त्यानंतर सीटीस्कॅन घेतला जातो. यामुळे द्रव कुठून नाकात गळत आहे हे अचूक ओळखता येते. गळतीचे स्थान निश्चित झाल्यानंतर शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली.
डॉ. राजीव केणी, डॉ. मृदुल भाटजीवाले, डॉ. लीना ठाकूर आणि भूलतज्ज्ञ डॉ. अभिजित यांनी एंडोस्कोपीद्वारे गळती यशस्वीपणे थांबवली आणि ओपन मेंदू शस्त्रक्रिया टाळण्यात आली. ही शस्त्रक्रिया व उपचार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.
आता वालावलकर रुग्णालयात पुणे, मुंबईसारख्या मोठमोठ्या रुग्णालयातून होणा-या अतिशय अवघड शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात होऊ लागल्या आहेत. याचे सर्व श्रेय जाते ते संस्थेने उपलब्ध करून दिलेली अतिशय उच्च दर्जाची, अशी उपचार यंत्रणा व सर्व डॉक्टर्स, स्टाफ नर्सेस व इतर कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नाना- डॉ. मृदुल भाटजीवाले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 02/Jul/2025














