रत्नागिरी : टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रियाज अकबर अलीला दुहेरी मुकुट

रत्नागिरी : येथील श्री मारुती-गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रियाज अकबर अलीने दुहेरी मुकुट पटकावला.

या स्पर्धेत जिल्हातून सर्व गटातून सुमारे २६४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभिषेक चव्हाण याने आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर अली विरुद्ध खेळताना पहिला सेट २५-०० असा जिंकून चांगली सुरुवात केली होती, परंतु रियाजने अनुभवाच्या जोरावर पुढील दोन्ही सेट २५-१५, २५-४ असे जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रियाज अकबर अली व अभिषेक चव्हाण या जोडीने राहुल भस्मे देवरुख व मुक्तानंद वरवडेकर चिपळूण या जोडीचा ११-०५ व १६-०० असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.

रत्नागिरी कॅरम स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच राजापूरची निधी सप्रे व रत्नागिरीची स्वरा मोहिरे अशा महिला व किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात दोन्ही सारखेच स्पर्धक होते. महिला गटाचे विजेतेपद स्वरा मोहिरे, तर किशोरी गटाचे विजेतेपद निधी सप्रे हिने मिळवले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला शशिकांत काळे, अध्यक्ष, टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, अरुण करमरकर विश्वस्त स्पर्धाप्रमुख मनोहर केळकर, मंदार खेर विश्वस्त, मिलिंद साप्ते (सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), नितीन लिमये (खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), विनय गांगण (सदस्य, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), विवेक देसाई (सदस्य, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), स्पर्धेतील प्रमुख पंच प्रकाश कानिटकर सहायक पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी, सचिन बंदरकर तसेच टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, जिल्ह्यातील कॅरम खेळाडू व कॅरमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्लाक टू फिनिशची नोंद रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याने केली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आनंद भिडे, मनोहर केळकर, मंदार खेर, निखिल आंबडेकर, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 02/Jul/2025