दापोली : दापोली बस स्थानकालगत दापोली-खेड या मुख्य मार्गावर उघड्यावर मासळी विक्री करणाऱ्या महिलांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. मासळीच्या पाण्याची दुर्गंधी आणि वाहतुकीला होणारा त्रास या बाबत अनेकांनी दापोली नगर पंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. यांची दापोली नगर पंचायत प्रशासन यांनी दखल घेऊन कारवाई केली आहे. यावेळी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली मासळी व अन्य साहित्य जप्त करून ते साहित्य कचऱ्यात फेकण्यात आले.
दापोली नगर पंचायतीची मासळी मार्केटची व्यवस्था आहे. शिवाय आता नव्या दिमाखात नवीन मासळी, मटन मार्केटची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मासे विक्रेत्या महिलांनीच येथे जाण्यास नकार दिल्याने ही इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. असे असताना दापोली बस स्थानकाच्या आवारात, समोर मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात मासळी विक्रेत्या महिला मासळी विक्रीसाठी बसत आहेत.
शिवाय या ठिकाणी मच्छीचे पाणी पडून अनेकवेळा दुर्गंधी देखील पसरते. या ठिकाणी येणाऱ्या लोकांना मच्छीचे पाणी सांडलेल्या परिसरातून प्रवास करावा लागतो असे असताना त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत नागरिकांमधून बोलले जात होते.
याबाबत स्वतः मुख्याधिकारी यांनी याठिकाणी मासे विक्री न करण्याबाबत समजावून सांगितले होते.परंतु कोणीच त्यांचे न ऐकल्याने नगरपंचायतीच्या पथकाने बस स्थानक परिसरात मासळी विक्री करणाऱ्या महिलांवर धडक कारवाई करत मासळी जप्त करून डंपिंग ग्राउंडला नेऊन टाकल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुन्हा मासळी विक्री करताना दिसल्यास धडक कारवाई करण्यात येणार आहे, असेदेखील बजावण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 02/Jul/2025














