चिपळूण : अलीकडच्या काही वर्षांत शहर व परिसरात घरफोड्यांसह चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकारांना आळा बसावा आणि चोरट्यांचा शोध लागावा यासाठी नगर परिषदेने काही भागात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र, ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार शहरातील विविध भागात आणखी ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
कोकणात मध्यवर्ती असणारे चिपळूण शहर झपाट्याने विकसित होत आहे. मोठमोठ्या इमारती, बंगले, अपार्टमेंटचे जाळे विणले जात आहे. तालुक्याची बाजारपेठही येथे मोठी आहे. गेल्या काही वर्षांत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेतील दोन मोठी दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम चोरली होती. यावेळी या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ते चोरटे टिपले गेले होते.
ही घटना ताजी असतानाच महिनाभरापूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फायदा उचलत राधाकृष्णनगर येथील तब्बल ९ सदनिका, तर दुसऱ्या दिवशी खेड व गुहागर बायपास रोड परिसरातील ४ अशा एकूण १३ सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडल्या. त्यानंतरही घरफोडीचे सत्र सुरूच आहे. घरफोड्या झालेल्या काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरी करून हे चोरटे कुठे गेले याचा सुगावा पोलिसांनाही लागला नाही. त्यामुळे चिपळूण पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोरही तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
आधीच्या काही घटना लक्षात घेत नगर परिषदेने शहरातील काही चौकांत ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण चिपळूण पोलिसांकडे होते. मात्र, ही यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य भागासह अंतर्गत रस्त्यांवर व रहदारीच्या ठिकाणीही आणखी ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. हे कॅमेरे उच्च दर्जाचे असून, आठवडाभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 02/Jul/2025














