“रोहिदास समाज सेवा संघ” या संस्थेला ‘फुले-शाहू-आंबेडकर सामाजिक न्याय पारितोषिक’ — मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व न्याय मंत्री यांच्या हस्ते सन्मान

रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघ या संस्थेच्या गेल्या ३७ वर्षांपासून सुरु असलेल्या सातत्यपूर्ण व निस्वार्थ समाजकार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे “फुले-शाहू-आंबेडकर सामाजिक न्याय पारितोषिक” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे तसेच सामाजिक न्याय मंत्री मा. संजयजी शिरसाट यांच्या शुभहस्ते एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयजी खेडेकर यांनी सांगितले की, “संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, मागास, दलित घटकांसाठी आरोग्य व शिक्षण, विद्यार्थी साहित्यवाटप, वृद्धाश्रम मदत, सामाजिक जनजागृती, संतांची जयंती यासारखे उपक्रम राबवत आहे. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण समाजासाठी मिळालेला सन्मान आहे.”

या पुरस्कार प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तसेच मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत, रत्नागिरी राजापूर विधानसभा आमदार भैय्या सामंत तसेच रत्नागिरी येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले ज्याबद्दल संस्थेने विशेष आभार व्यक्त केले आहेत.

कार्यक्रमास अनेक मान्यवर, समाजबांधव, पदाधिकारी, पालक आणि स्वयंसेवक उपस्थित होते. संस्थेने आगामी काळात समाजहितासाठी आणखी व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 02-07-2025