रत्नागिरीच्या सुरभि अभ्यंकर यांना अमेरिकेतील डॉक्टरेट

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या कर्ला गावच्या सुकन्या सुरभि दीपक अभ्यंकर यांना अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (इंडियाना पोलिस) , येथून जैवरसायनशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्र (PhD in Biochemistry and Molecular Biology) या विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.

अशी पदवी मिळविणाऱ्या त्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या विद्यार्थिनी आहेत.

गेल्या १५ मे २०२५ रोजी इंडियाना युनिव्हर्सिटीत पार पडलेल्या मुख्य दीक्षांत समारंभात फक्त पीएच.डी. विद्यार्थ्यांची नावे व्यासपीठावर जाहीर करण्यात आली. त्यावेळी सुरभि यांना त्यांच्या संशोधन मार्गदर्शकाच्या हस्ते ‘डॉक्टोरल हूडिंग’ करण्यात आले. पीएच.डी.चा शालप्रकार (हूड) खास राजेशाही निळ्या रंगाचा असतो. तो विद्येच्या उच्चतम स्तराचे प्रतीक मानला जातो. याच समारंभात युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष डॉ. पामेला व्हिटन यांनी डॉक्टरेट पदवी अधिकृतरीत्या जाहीर केली.

इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या स्वतंत्र समारंभात १६ मे रोजी सुरभी यांना पुन्हा एकदा डॉक्टोरल हूडिंग देण्यात आले. तसेच स्कूल ऑफ मेडिसिनचे डीन यांच्या हस्ते पीएच.डी. पदवीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे या समारंभाच्या स्मरणिकेत त्यांच्या शैक्षणिक यशाची विशेष नोंद घेण्यात आली आहे. Sigma Xi Grants-in-Aid of Research, Elite 50 Graduate Recognition आणि Peter J. Roach Graduate Fellowship या तीन वेगवेगळ्या राष्ट्रीय गौरवांकरिता या स्मरणिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या मान्यतांचा सन्मान मिळणे ही अतिशय प्रतिष्ठेची बाब मानली जाते.

सुरभि अभ्यंकर यांची ही प्रेरणादायी वाटचाल म्हणजे चिकाटी, जिद्द, कुटुंबीयांचा आधार आणि विज्ञानावरील निष्ठा यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:14 02-07-2025