रत्नागिरी : साहित्य आणि वाचन चळवळीत भरीव योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखेचे स्वीकृत कार्यकारिणी सदस्य श्री. श्रीकांत पाटील यांना नुकताच प्रतिष्ठेचा ‘कोकणदीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकणदीप प्रतिष्ठानतर्फे साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
गेली २६ वर्षे कोकणदीप प्रतिष्ठान साहित्य आणि वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करत आहे. आतापर्यंत जवळपास तीन हजार व्यक्तींना या संस्थेने सन्मानित केले आहे. ‘कोकणदीप’ नावाचे त्यांचे साहित्यविषयक मासिकही साहित्य क्षेत्रात प्रसिद्ध आहे.
श्री. पाटील यांनी बसणी पंचक्रोशी वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून, कुवारबाव येथील स्वामी स्वरूपानंद वाचन मंदिराचे अध्यक्ष म्हणून, तसेच नाचणे येथील कुसुमताई अभ्यंकर वाचन मंदिराचे उपाध्यक्ष म्हणून सातत्याने भरीव कार्य केले आहे. त्यांच्या या अविरत सेवेची दखल घेऊन त्यांना यावर्षी ‘कोकणदीप’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबई येथील कोकणदीप प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र वाचन मंडळाच्या पहिल्या मजल्यावर नुकताच पार पडला. श्री. पाटील यांच्या या विशेष सन्मानानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखेने दिनांक १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, उपाध्यक्ष श्री. श्रीकांत भाटवडेकर, खजिनदार सतीश दळी, कार्यवाह श्री. वामन कदम, सहकार्यवाह अमेय धोपटकर, सदस्य ॲड. रजनी सरदेसाई, श्री. विजय पोकळे, नागेशजी बेर्डे, श्री. मनोहर जोशी, श्री. सनातन रेडीज, श्री. संतोष सनगरे, श्री. अनिल दांडेकर, श्री. सुधाकर बेहरे, श्री. दादा कदम आणि श्री. शाम मगदूम आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 02-07-2025














