शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

रत्नागिरी, दि. २ : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापनाने सर्व आवश्यक बाबींची आणि वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, वाहतूक शाखा पोलीस उपनिरीक्षक शरद घाग, शिक्षण विभागाचे रुखसाना भाटकर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे रामेश्वर जायभाये, वाहतूकदार प्रतिनिधी प्रमोद यादव, आणि जिल्ह्यातील विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महत्वाच्या सूचना आणि निर्णय:

सुरक्षिततेचा आढावा: श्री. बगाटे यांनी शालेय परिवहन समितीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.

कागदपत्रांची तपासणी: स्कूल वाहनांची सर्व कागदपत्रे (उदा. नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, चालकाची अनुज्ञप्ती व बॅच) यांच्या वैधतेची तपासणी करावी.

थांबे निश्चित: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य थांबे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

पालकांना आवाहन: पालकांनीही आपल्या मुलांची शाळेत ने-आण करताना सुरक्षित पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले.

नोडल अधिकारी: सर्व शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्यावर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई: शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली आणि माननीय न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर तसेच अनधिकृत, अवैध व धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दोषी वाहनांवर देखील कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले.

रस्ते सुरक्षा उपाय: शाळांसमोरील रस्त्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये आणि विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व शाळांसमोरील रस्त्यांवर गतिरोधक, इशारा फलक, रंबलर स्ट्रिप इत्यादी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत संबंधित सर्व रस्ते यंत्रणांना आदेशित करण्यात आले.

वाहनांची तपासणी: पोलीस आणि परिवहन विभागाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करून दोषी वाहनांवर व वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कटिबद्ध असून, या नियमांचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 02-07-2025