कोकणचे सुपुत्र, नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मुंबईत सत्कार!

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, कोकणचे सुपुत्र आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचा नुकताच मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात विशेष सन्मान करण्यात आला. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच रत्नागिरी नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन सन्मानचिन्ह प्रदान करत आपला अभिमान व्यक्त केला.

या विशेष भेटीत भाजपच्या महिला प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगरसेवक मुन्ना चंवडे, उमेश कुळकर्णी, राजू तोडणकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमकर, राजू भाटलेकर, राजन फाळके आणि मंदार खंडकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरीच्या सुपुत्राचा पुढाकार

या सन्मान सोहळ्याचे विशेष श्रेय रत्नागिरीचे सुपुत्र अनिकेत पटवर्धन यांना जाते. त्यांच्या पुढाकारामुळेच हा सन्मान सोहळा यशस्वीपणे पार पडला.

या भेटीत रवींद्र चव्हाण यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्याचे आणि कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये नवचेतना निर्माण झाली असून, आगामी काळात कोकणातील भाजप संघटन अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरी नगरपालिकेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.