अज्ञात वाहनाच्या धडकेत झारखंडमधील मजूर गंभीर जखमी; चालकाविरोधात गुन्हा दाखल

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर तळेकांटे पोस्ट ऑफिसजवळ एका अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुराला चिरडले. या अपघातात मजूर गंभीर जखमी झाला असून, अज्ञात वाहनचालकाविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३ जून २०२५ रोजी पहाटे २.०० वाजताच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संगमेश्वर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोहेकॉ/१२७३ विनय वसंत मनवल (वय ३७) यांनी २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.२४ वाजता दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड राज्यातील रवि लदु बेसरा (वय ३२, रा. पोस्ट घोडालेगी, पंचायत घोडालेंगी चांडील, सरायकेला-खरसावाँ) हे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून काम करत होते. घटनेच्या दिवशी ते काम संपवून दारू प्यायले आणि महामार्गाच्या साईडपट्टीच्या बाहेर झोपले होते. याचवेळी एका अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवत, रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, साईडपट्टीला लागून झोपलेल्या रवि बेसरा यांच्या दोन्ही पायांवरून गाडी घातली.

या अपघातात रवि बेसरा यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता तिथून पसार झाला.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 03-07-2025