राजापूर-दसूर मार्गावर ओएफसी केबलसाठी खोदलेल्या चरात अडकली एसटी

राजापूर : राजापूर ते दसूर मार्गाच्या कडेला एका कंपनीने ओएफसी केबलसाठी खोदलेल्या चरांमुळे हा मार्ग वाहन चालक व प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. मंगळवारी राजापूर ते भवानीमंदिर जाणारी एसटी बस अशीच रस्त्यालगतच्या चरात अडकल्याची घटना घडली. यापूर्वी १५ ते २० वाहनांच्या बाबतीत असेच प्रकार घडले असून बांधकाम विभागाने यावर तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राजापूर ते दसूर हा राजापूर तालुक्यातील एक प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. भू खिनगिणी, तेरवण, थोरलीवाडी, पेंडखळे वडदहसोळ, भालावली, देवीहसोळ, कोतापूर या सर्व गावातील प्रवासी व नागरिक या रस्त्याचा वापर करतात.

यावर्षी एका कंपनीने आपली ओएफसी केबल नेण्याकरिता या रस्त्याच्या अगदी कडेला चर खोदले आहेत. सदरची बाब या परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यावर संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या या चरातील माती खचली आहे. त्यावरुन वाहन गेल्यास रूतून बसणे, वाहन कलंडणे असे प्रकार महिनाभर सुरू आहेत. शाळेतील मुलं असलेली राजापूर ते भवानी मंदिरपर्यतची एसटी या साईड पट्टीमुळे कलंडली आहे. सुदैवाने झाडाला टेकल्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. या मार्गावर याआधी असे प्रकार घडले असताना प्रशासनाकडून सपशेल डोळेझाक केली जात आहे. त्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 03/Jul/2025