रत्नागिरी : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना पांढरा समुद्र मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची पाहाणी करून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या १२०० मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. पत्तन विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली होती. लवकरात लवकर उर्वरित टप्प्याचे आणि बंधाऱ्याच्या टॉपचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या होत्या.
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्यांचे काम झाले आहे. सुमारे साडेतीन किमी लांब हा बंधारा आहे. मात्र, सध्या पावसाचा कालावधीत समुद्राला आलेल्या उधाणाच्या अजस्त्र लाटा या बंधाऱ्यावर येऊन धडकत आहेत. त्या लाटांच्या दणक्याने नव्याने उभारणी झालेल्या टप्प्यातील बंधाऱ्याला तडाखा बसला आहे. लाटांच्या दणक्याने बंधाऱ्याच्या पायाखालील वाळू सरकून दगडही सरकले आहेत. त्यामुळे भाटकरवाडी परिसरातील या प्रकाराने त्या बंधाऱ्यासाठी बसविलेले टेट्रापॉडही सरकले आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 03/Jul/2025














