रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न; बिपीन पाटणेंकडून विद्यार्थ्यांना यशाचे कानमंत्र!

खेड : रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे २ जुलै २०२५ रोजी वैश्य भवन, खेड येथे रत्नागिरी जिल्ह्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या वैश्य वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या विशेष कार्यक्रमात रोटरी स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन पाटणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

आपले मनोगत व्यक्त करताना बिपीन पाटणे यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मोलाचा सल्ला दिला. “प्रयत्न करणारे नेहमी यशस्वी होतात,” असे सांगत त्यांनी सध्याच्या वाढत्या स्पर्धेकडे लक्ष वेधले. दहावी आणि बारावीच्या वाढलेल्या निकालांमुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली असून, सर्वोत्तम गुण मिळवण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे असे ते म्हणाले. नीट (NEET) आणि जेईई (JEE) सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच जिद्द आणि कठोर मेहनत घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बिपीन पाटणे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तासिका वाढवून अधिकाधिक वेळ अभ्यासासाठी खर्च करण्याचा सल्ला दिला. “आपल्याकडे जिद्द असेल तर आपण कोणतेही यश सहज संपादन करू शकतो. अभ्यास करून ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करा,” असे आवाहन त्यांनी केले. आपल्याला नेमके काय करायचे आहे, याचा अंदाज बांधून आपल्या यशाची दिशा ठरवण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. ‘कोशिश करने वालों की कभी हार नही होती’ या प्रसिद्ध काव्यपंक्तीचा दाखला देत, प्रयत्नांमध्येच यशाचे रहस्य दडलेले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, बिपीन पाटणे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 03-07-2025