लांजा : पालू येथे वीजेचा खांब घरावर कोसळला

लांजा : दोन दिवस जोरदार पाऊस असून बुधवारी सकाळी पडलेल्या वादळी पावसाने पालू गावातील एका घरावर महावितरणचा विद्युत खांब कोसळल्याने पराचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. घरातील माणसे शेतात गेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र महावितरणचा विद्युतपुरवठा दिवसभर खंडित झाला होता.

पालू गावातील मनोहर आभाराम नामे यांच्या घरावर महावितरणचा विद्युत खांब पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. काही दिवस ऊन-पावसाचा लपंडाव सुरू असतानाच सोमवारपासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. सकाळी ९.३० वाजता पडलेल्या पावसाने पालू परिसराला झोडपले. यामध्ये महावितरणचा विद्युत खांब येथील मनोहर नामे यांच्या घरावर कोसळला. त्यामुळे घराचे पत्रे फुटले असून भिंतीला भेगा पडल्या आहेत. घरातील काही माणसे शेतामध्ये गेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला, तर गावातील काही ठिकाणी विद्युत खांब जमिनीकडे झुकल्याने पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता येथील नागरिकांनी वर्तवली आहे.

पालू येथील अनेक ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब गंजलेल्या, सडलेल्या अवस्थेत असून, ग्रामस्थांनी अनेक वेळा महावितरणकडे दुरवस्थेतील खांब काढून त्या ठिकाणी नव्याने उभे करावेत, अशी मागणी केली होती; मात्र ग्रामस्थांच्या या मागणीकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने पालू गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी पडलेल्या पावसामुळे जीर्ण झालेले विद्युत खांब पडून येथील शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 03/Jul/2025