खेड : मागील दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर खेडात पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली आहे. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून, किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. १) रात्रीपासून खेड तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी दिवसभर संततधार होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण पट्ट्यात पावसाचा जोर कमी आहे. अधूनमधून सरी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत होती. दुपारच्या सुमारास कडकडीत उन पडलेले होते. जिल्ह्याच्या उत्तर पट्ट्यात पावसाचा जोर वाढलेला असून खेड तालुक्यातील जगबुडी नदी सध्या ५ मीटरवरून वाहत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून जनजीवन अंशतः विस्कळीत झालेले आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाने खेड तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला अक्षरशः झोडपून काढले. पावसाचा जोर कायम राहिला असल्याने नदी पात्रामधील पाणी वाढत आहे. तालुक्यातील कशेडी-खवटी तसेच ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 03/Jul/2025














