गुहागर : तळवली पंचक्रोशीत विजेचा खेळखंडोबा

गुहागर : तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून, महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत चांगलेच संतप्त झाले आहेत. नव्याने येथील कार्यभार स्वीकारलेल्या महावितरण अभियंता फर्नाडिस यांच्यासमोर तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी येथील गलथान कारभाराचा पाढा वाचला. लवकरात लवकर कारभारात सुधारणा न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन कार्यालयाला ग्रामस्थ टाळे लावतील, असा सक्त इशारा या वेळी देण्यात आला.

गेले कित्येक दिवस वादळ, पाऊस नसताना देखील येथील पंचक्रोशीतील गावांमध्ये सातत्याने रात्रीच्यावेळी वीजपुरवठा नेहमीच खंडित होतो; मात्र याकडे लक्ष देण्यास महावितरणला वेळच नसल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा याबाबत पंचक्रोशीतील काही ग्रामस्थांनी तळवली महावितरण कार्यालयात तक्रारी केल्या होत्या तर काहीवेळा प्रत्यक्ष भेटूनही येथील कारभारात कोणतीच सुधारणा झालेली नाही. अखेर पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी नव्याने पदभार स्वीकारलेल्या महावितरण अभियंत्याना येथील गलथान कारभाराचा पाढाच वाचून दाखवला. या वेळी प्रा. अमोल जडयाळ यांनी येथील कारभाराबाबतची माहिती नवीन अधिकारी यांना दिली. त्यानंतर प्रतिनिधींनी आपल्या गावातील समस्या मांडल्या. या वेळी फर्नांडिस यांनी लवकरच कारभारात सुधारणा करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 03/Jul/2025