दापोली : अखंड विजेसाठी दाभोळवासीयांचा विद्युतवितरण कार्यालयावर धडक मोर्चा

दापोली : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, संबंधित अधिकाऱ्यांची कामात दिरंगाई, ठेकेदाराचा मुजोरपणा, कार्यालयातून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, नियोजित नसणारा आराखडा, कुशल लाईनमनची कमतरता, वाढीव वीज बिले, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नसणारे नियंत्रण अशा अनेक समस्यांमुळे पंचक्रोशीतील ग्रासलेल्या वीजग्राहकांनी दाभोळ शिवसेना शाखेच्या माध्यमातून दाभोळ येथील विद्युतवितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.

ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दाभोळ कार्यालयात दापोली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कुकडे उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्याशी चर्चा सुरू असताना कार्यालयामध्येदेखील सातत्याने वीजप्रवाह खंडित होत होता; मात्र वीजप्रवाह खंडित होण्याचे समर्पक उत्तर संबंधित अधिकाऱ्यांना देता आले नाही. शेवटी उपकार्यकारी अभियंता कुकडे यांनी २ ते ४ दिवसांत युद्धपातळीवर काम करून वारंवार वीज खंडित समस्या सोडवून देतो, असे सांगितले. त्यावर उपस्थित शिवसैनिक व ग्रामस्थांनी ८ दिवसांची मुदत दिली व जे कबूल केले ते लिखित द्या, अशी मागणी केली. त्यामुळे उपकार्यकारी अभियंत्यांनी लिखित आश्वासन पत्र दाभोळ शिवसेना शाखाप्रमुख रमाकांत दाभोळकर यांच्याकडे सुपूर्द केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 03/Jul/2025