संगमेश्वर : ऐन शेती हंगामात संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी गावात पाळीव जनावरांना ‘फूट रॉट’ या रोगाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामध्ये एक करडू आणि दोन रेडकं दगावली आहेत. ही बाब समजल्यानंतर पशुवैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, तातडीने संबंधित पाळीव जनावरांची तपासणी केली. बुरंबी गोपाळवाडी म्हैस व रेडे ६ आणि ५ शेळ्या फूट रॉट रोगाने बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फूट रॉटचे बाधित प्रथमच जिल्ह्यात आढळल्याचे संगमेश्वर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
बुरंबी गोपाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांची गुरे आजारी पडल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक होते; मात्र या गावातील परिसरात पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वैद्यकीय अधिकारी, परिचर नसल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच फरपट झाली होती. तापाने मलूल पडलेल्या जनावरांची परिस्थिती पाहून शेतकरीही हतबल झाले. उपचाराअभावी अनिल गजबर यांची दोन जनावरे डोळ्यांसमोरच दगावली.
एका शेतकऱ्याची बकरी उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडली. पाळीव जनावरे आजारी पडत असल्याची माहिती संगमेश्वर येथील सहायक आयुक्त पशुवैद्यकीय डॉ. युवराज शेटे यांना मिळाली. ते पशुविभागाच्या पथकासह तत्काळ गोपाळवाडी येथे रवाना झाले. त्यांनी शेतकरी गजबार यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्या पाळीव जनावरांना फूट रॉट आजाराची लागण झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार बाधित जनावरांवर उपचार सुरू केले आहेत. याबाबत डॉ. शेटे म्हणाले, ‘फूट रॉट या आजारामुळे बाधित जनावरांची जिल्ह्यात प्रथमच नोंद झालेली आहे. चिखलात चालल्यामुळे जनावरांच्या पायाच्या नसांना दुखापत झालेली आहे. जनावरांना तापही आलेला होता. गोपाळवाडीतील शेतकऱ्याची गाय परजिल्ह्यातून विकत आणली होती. ती व्यायली आणि वासरू झाले होते. ते यामध्ये दगावले आहे. ती गाय आजारातून बरी झाली आहे, तसेच एक करडूही दगावले आहे. बाधित जनावरांची तपासणी करून उपचार सुरू केले आहेत. ती जनावरे लवकरात लवकर बरी होतील; मात्र अन्य गावांतून या आजाराने जनावरे बाधित झाल्याची नोंद नाही.’
बुरंबीतील दवाखाना कायम कुलूपबंद
संगमेश्वरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरंबी गावात पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभारण्यात आली आहे; मात्र त्या इमारतीचा उपयोग केला जात नाही. त्याला कायम कुलूप लावलेले असते. त्यामुळे हा दवाखाना म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा असाच आहे. त्या ठिकाणी कोणतीही माहिती दिली जात नाही. तसेच फलकावर डॉक्टरचा किंवा परिचराचा संपर्क क्रमांक दिलेला नाही. परिणामी, शेतकऱ्यांना ऐनवेळी मदत मिळत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 03/Jul/2025














