साडवलीच्या माळरानावर दीपकाडीच्या फुलांची दुलई

संगमेश्वर : हिरव्या माळरानांवर फुलणारी विविधरंगी फुले म्हणजे जणू धरणीमातेचे इंद्रधनुष्य असते. देवरुखजवळील साडवली येथे माळरानावर सध्या सर्वत्र दीपकाडीच्या पांढऱ्या फुलांची दुलई पसरल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. दीपकाडीचा समावेश संकटग्रस्त प्रजातीमध्ये करण्यात आला आहे. दीपकाडीला गुलछडी असेही म्हटले जाते. यावर्षी पावसाला मे महिन्यातच दमदार सुरुवात झाल्याने दीपकाडीची मनमोहक फुलं आषाढाचे स्वागत करत आहेत. परिणामी, हिरव्यागार निसर्गात शुभ्र फुलांची जणू आषाढवारीच सुरू असल्याचा भास होत आहे.

साडवलीच्या माळरानावरील हा अनोखा नजारा पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थच येतात असे नव्हे, तर संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची पावलंदेखील हा नजारा पाहून जागीच थबकतात. दीपकाडी ही वनस्पती अत्यंत नाजूक असल्याने ती पायदळी तुडवू नये. तसेच छायाचित्रे घेताना देखील तिचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन सृष्टीज्ञान संस्थेने केले आहे.

दीपकाडी म्हणजेच गुलछडीची कथा उन्हाळ्याच्या शेवटी सुरू होते. कातळाच्या गर्भातून प्रकटलेल्या हिरव्यागार पाती वाढत जाऊन एका दांडीच्या रूपात मोठ्या होतात. आषाढाच्या दिवसभर पडणाऱ्या पावसात त्यांना अलगद कळ्या येतात. दांडीच्या टोकाला पांढरेशुभ्र गायमुखी फुलं आले की, नंतरच या वनस्पतीचे महत्त्व अधोरेखित होते. हिरवागार शालू नेसलेला काळा कातळसडा वर्षभर दुर्लक्षित असला तरी या पांढऱ्या फुलांनी तो अचानक नजरेत भरू लागतो. फुलांवर लपून बसलेले कोळी, अलगद फिरणारे पिपिट आणि चंडोल, उड्या मारणारे बेडूक असे सर्वच जीव या फुलोऱ्याच्या आश्रयाला येतात, अशी माहिती प्रतीक मोरे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 03/Jul/2025