खेडजवळ रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

खेड : खेड तालुक्यातील धामणदेवी येथील रेल्वे ट्रॅकजवळ आज पहाटेच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृताचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, त्याची ओळख पटलेली नाही. त्याच्या खिशात माणगाव ते रत्नागिरी असे ५० रुपयांचे रेल्वे तिकीट सापडले आहे.

ही घटना २ जुलै २०२५ रोजी रात्री १.०० वाजण्याच्या सुमारास धामणदेवी येथील मधलीवाडीत, उत्तर-दक्षिण जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर मैलाचा दगड क्रमांक १२२/३४ पासून उत्तरेस सुमारे २० फूट अंतरावर, रेल्वे ट्रॅकच्या पूर्वेकडील वाढलेल्या गवतामध्ये घडली.

याबाबतची खबर धामणदेवी गवळीवाडी येथील पोलीस पाटील संजय पांडुरंग बहुतुले (वय ५४) यांनी २ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.२५ वाजता खेड पोलीस ठाण्यात दिली. खबरनुसार, हा अनोळखी पुरुष माणगाव ते रत्नागिरी असा रेल्वे प्रवास करत असताना तो रेल्वेतून खाली पडला असावा. त्याला दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

खेड पोलिसांनी या घटनेची नोंद आमू. क्रमांक ७१/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे केली असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे आणि पुढील तपास करण्याचे काम सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 03-07-2025