संगमेश्वर : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून संगमेश्वर तालुक्यात तुरळ-माखजन सरंद आंबवपोक्षे ते आरवली हा ९.२३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ७ कोटी ४० लाख १५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. हे काम असमाधानकारक असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे यांनी केली आहे. संरक्षण भिंत नसल्यामुळे आंबवपोंक्षे ते आरवली दरम्यान हा रस्ता पहिल्याच पावसात खचला आहे. अनेक ठिकाणी गटारे नसल्यामुळे रस्त्याची बाजूपट्टी वाहून गेली असून, मोठमोठ्या चरी पडल्या आहेत. यावरून रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आम्हाला शंका आहे, असा आक्षेप भायजे यांनी घेतला आहे.

तुरळ ते आरवली रस्त्याविषयी भायजे यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, पहिल्या पावसात रस्त्याची दुरवस्था झाली असून, डांबरीकरणावरून गाडी जरा बाहेर गेली तर उलटण्याची भीती आहे. घडशीवाडी स्मशानभूमी येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून एसटी बस वळवण्यासाठी ४० मीटर लांबी-रुंदीचे दुहेरी सोलिंग व खडीकरण करून रस्ता केला होता. त्याच ठिकाणी गेल्यावर्षी गरज नसताना मोरी टाकली गेली. त्या मोरीतून पाणी नाल्यातच जाण्याऐवजी नाल्याचेच पाणी मोरीतून गटारात येत आहे. तेच पाणी वाडीतील लोकांच्या घरादारात शिरत आहे. त्यामुळे ती मोरी काढून टाका, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली होती; मात्र अद्याप संबंधित ठेकेदाराने ती मोरी काढलेली नाही. कामाच्या अंदाजपत्रकात सरंद जाधववाडी येथे व आंबवपोंक्षे जुनी मराठी शाळा येथे दोन कॉबवेसाठी निधी मंजूर केला आहे. त्या कॉजवेऐवजी तिथे स्लॅब ड्रेन घ्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्या ठिकाणी पावसात पाणी आले असून, कॉजवेवरून ये-जा करणे ग्रामस्थांना गैरसोयीचे होत आहे. पावसात नाल्यातील कचरा अडकल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यात शेतीचे नुकसान झालेले आहे. या सर्व समस्या वेळीच सोडवणे गरजेचे आहे.
अंदाजपत्रकानुसार काम नाही
आंबवपोंक्षे ग्रामपंचायत कार्यालय ते आरवली या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेकडील डोंगरीविकास, स्थानिक विकास व जिल्हा नियोजनमधून प्राप्त ६० लाख रुपयांच्या निधीतून ३१ मे २०२३ ला पूर्ण झाले. यासाठी आमदार शेखर निकम यांनी प्रयत्न केले होते; परंतु पावसाळ्यानंतर त्याच रस्त्यावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २०० मीटर डोंगराचा भाग वगळता अडीच किलोमीटर रस्त्यावर बीबीएम व कार्पेट करण्यात आले. त्या रस्त्याचे काम अंदाजपत्रकात दिल्यानुसार झालेले नाही. रस्त्यावर खडीचे तीनही थर टाकण्यात आलेले नाहीत. तसेच डांबरीकरणाचा सिलकोटही टाकलेला नाही, असे निरीक्षण भायजे यांनी नोंदवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 03/Jul/2025














