रत्नागिरी : अकरावीच्या प्रवेशाचा घोळ वाढतच चालला असून, आता नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट एनटी, ओबीसी, एससी, बीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केले आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडणार असून, याबाबत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवेशासाठी शहरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशासाठी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना यामुळे परत फिरावे लागले. सरकारचा हा निर्णय म्हणजे पालकांसाठी नवीन डोकेदुखी बनली आहे.
उपरोक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मिळवण्याच्या या प्रमाणपत्राची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. सरकारच्या निर्णयानुस्वार, नॉन क्रिमिलेअरचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती अपलोड करणे पुरेशी आहे; मात्र ही प्रक्रिया आगामी दोन दिवसांत पूर्ण होणे शक्य नाही. विहित तारखेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही आणि संबंधित पावती जोडता आली नाही तर विद्यार्थी प्रवेशाला मुकणार आहेत.
तो दाखला मिळण्यासाठी केलेल्या अर्जाचे टोकन शासनाला चालणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांने दिलेले स्वतःचे अंडरटेकिंग चालत होते. आता असे अंडरटेकिंग शासनाला चालणार नाही.
खुल्या प्रवर्गातून पुढील फेरीत प्रवेशअर्ज विद्यार्थ्यांना भरायला सांगितला की, इतर प्रवर्गातील विद्यार्थी खुल्या प्रवर्गात येणार, तेथे स्पर्धा आणि स्पर्धेपेक्षाही संख्या वाढणार. त्यामुळे ज्या प्रवर्गातून प्रवेश देण्याची सरकारची तरतूद आहे तेथून त्यांना जणू वंचित करणारा निर्णय घेण्यात आला आणि खुल्या प्रवर्गात संख्या वाढल्याने अशा सर्वांना फी भरावी लागेल आणि अनेकजण प्रवेशापासून वंचित राहतील.
बनावट प्रिंट करून जोडली तर
टोकन म्हणून कोणी सेतूच्या नावाची कॉम्प्युटराईज बनावट प्रिंट करून जोडली तर त्याला आव्हान देण्याची कोणतीही यंत्रणा संबंधित महाविद्यालयांकडे नाही. कालांतराने जर ती पावती बनावट असल्याचे सिद्ध झाले तर त्याला जबाबदार कोणाला धरणार? संस्था याचाबत अडचणीत येऊ शकतात.
विद्यार्थी दोन फेऱ्यांसाठी प्रतिबंधित
जे विद्यार्थी नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट अथवा त्यासाठीची सरकारला चालणारी पावती जोडू शकले नाहीत त्यांना प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीतून बाद करावे, असे शासनाने सांगितले आहे. अशा विद्यार्थ्यांनी पुढच्या फेरीत खुल्या प्रवर्गातून प्रवेशअर्ज भरावा, असे शासनाचे फर्मान आहे. यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीत नाव असूनही प्रवेश घेतला नाही तर तो विद्यार्थी पुढील दोन फेऱ्यांसाठी प्रतिबंधित होणार आणि नंतर जागा असेल तरच त्याला प्रवेश मिळणार, असा हा तिढा आहे.
शासनाने हे फर्मान वेळेत काढले असते तर विद्यार्थ्यांनी तशी प्रमाणपत्र घेतली असती, परंतु आता विद्यार्थ्यांकडे वेळ कमी आहे आणि या घोळामुळे त्यांची प्रवेशाची संधीही धोक्यात आली आहे महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व तिढ्यावर योग्य ती माहिती देण्यात शिक्षण विभागाकडे सक्षम अधिकारीही नाही-सतीश शेवडे, कार्यवाह, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 03/Jul/2025














