गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्र हा मोठ्या प्रमाणात खवळलेला असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव जयगड सागरी पोलीस ठाण्याकडून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी दोन ठिकाणी जाहीर सूचना फलक लावण्यात आले आहेत.
या सूचनानाफलकामध्ये जयगड सागरी पोलीस ठाण्याने असे म्हटले आहे की गणपतीपुळे समुद्र हा खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनारी पर्यटकांनी प्रवेश करू नये तसेच समुद्राच्या पाण्यात जाऊन स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये. आपला जीव आपल्या कुटुंबासाठी मोलाचा आहे. सावधान रहा, सतर्क रहा, अशा आशयाचा सूचनाफलक गणपतीपुळे समुद्रकिनारी लावण्यात आला आहे.
येथील समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आल्याकारणाने मोठमोठ्या लाटा सध्या उसळत आहेत. या मोठमोठ्या लाटा थेट समुद्रकिनाऱ्यावरच्या संरक्षण भिंतीच्या पायऱ्यांपर्यंत येऊन धडकत आहे. तसेच गणपतीपुळे मंदिराच्या प्रसाद रांगांपर्यंत समुद्राचे पाणी शिरले होते. त्यामुळे समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन जयगड सागरी पोलिस ठाण्याकडून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सावधानतेचा सूचना फलक लावण्यात आला आहे. या सूचनांचे आलेल्या भाविक व पर्यटकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जयगड सागरी पोलिस ठाण्याने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 03/Jul/2025














