लांजा : तालुक्यातील गवाणे-मावळतवाडी येथे डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सोडवण्यात लांजा वनविभागाला यश आले. ही घटना गुरुवारी (ता. ३) सकाळी उघडकीस आली.
लांजा तालुक्यातील गवाणे, पुनस, लांजा परिसरात अनेक दिवस बिबट्याचा वावर सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. यासह पंधरा दिवसांपूर्वी पुनस येथे सापडलेले बिबट्याचे पिल्लू अजूनही वनविभागाच्या ताब्यात आहे. गवाणे-मावळतवाडी येथील लोकवस्तीपासून जवळच असलेल्या एका कंपाउंडला अज्ञात व्यक्तीने डुकराच्या शिकारीसाठी तारेची फासकी लावली होती. रात्रीच्यावेळी लोकवस्तीकडे भक्ष्याचा पाठलाग करताना तो फासकीत अडकला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

लोकवस्तीपासूनजवळ असलेल्या कंपाउंडच्या दिशेने गुरुवारी सकाळी अज्ञात प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने मावळतवाडी येथील काही नागरिकांनी आवाजाच्या दिशेने पुढे जाऊन पाहिले. फासकीत बिबट्या अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही माहिती सुरेश तानाजी करंबळे (गवाणे) यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनविभागाला दिली.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर बिबट्याला वाचवण्यासाठी नागरिकांच्या मदतीने पिंजरा लावण्यात आला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. जेरबंद केलेला बिबट्या नर असून, अंदाजे अडीच वर्षांचा होता. बिबट्याला वन अधिवासात सोडण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 04/Jul/2025














