रत्नागिरी : विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून राज्यभरात आचारसंहिता देखील लागली आहे. मात्र निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा चर्चेत होता. या मतदारसंघात महायुती मध्ये काहीतरी बिनसणार असे बोलले जात होते. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अत्यंत हुशारीने आणि संयमाने हि परिस्थिती हाताळल्याचे बोलले जात असून येत्या दोनच दिवसात याबाबतचे खुलासे समोर येतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
रत्नागिरी मतदारसंघात काय परिस्थिती ?
भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची या पार्श्वभूमीवर आलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. चार दिवसांपूर्वी माजी आमदार बाळ माने यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वेगळा निर्णय घेत असल्याचे सुतोवाच केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली होती. बाळ मानेना न्याय मिळाला पाहिजे असे सामंत म्हणाले होते. आता हा न्याय येत्या काही दिवसात मिळून सर्वकाही सुरळीत होईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहेत. मंत्री उदय सामंत यांनी आपले कौशल्य पणाला लावत सर्वकाही सुरळीत केल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे.









