चिपळूण : तालुक्यातील ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोधमोहीम १ जुलैपासून हाती घेण्यात आली आहे.
ही मोहीम १५ जुलैपर्यंत राबवली जाणार आहे. मोहिमेंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, अशी सूचना आमदार शेखर निकम यांनी शिक्षण विभागाला केली आहे.
बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी आमदार निकम यांनी शिक्षण विभागातील समस्यांचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना केली. प्राथमिक शाळेतील शिक्षक, अंगणवाडीचे शिक्षक या मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करत आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, कातभट्ट्या, वीटभट्ट्या, दगडखाणी, चिरेखाणी, खेर्डी, खडपोली औद्योगिक वसाहतीमधील झोपडपट्ट्या या ठिकाणी भेटी देऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. या मोहीमेमुळे नोकरी, व्यवसायानिमित्त स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे सोपे होणार आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही.
तालुक्यातील ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने गांभीर्याने काम करावे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे. तालुक्यात अनेक शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतला तर शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल आणि गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल- शेखर निकम, आमदार, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 04/Jul/2025














