रत्नागिरी : शहरातील खेडशी, एकतानगर येथे एका मित्रानेच आपल्या मित्राचा विश्वासघात करत त्याचा मोबाईल, मोटारसायकल घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून ३३ हजार रुपयेही काढून घेतले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिपक चंपालाल चौधरी (वय ३३, रा. खेडशी, रत्नागिरी) हे गुरुनाथ कृष्णा कळंगुटकर यांच्या घरी भाड्याने राहतात. त्यांच्यासोबत पनवेल येथील अकरम शेख हा देखील राहत होता. दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान दिपक चौधरी घरात झोपलेले असताना, अकरम शेखने त्यांच्या मालकीचा टेक्नो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन आणि एम.एच.०८.यु.२८३१ क्रमांकाची टी.व्ही.एस. स्पोर्ट मोटारसायकल घेऊन पलायन केले.
केवळ एवढ्यावरच न थांबता, आरोपी अकरम शेखने दिपक चौधरी यांच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या ए.यू. बँकेच्या खात्यातून स्वतःसाठी ३३,००० रुपये काढून घेतले. या घटनेमुळे दिपक चौधरी यांना मोठा धक्का बसला आहे.
याप्रकरणी दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.४३ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१६(२) नुसार गुन्हा क्र. १३१/२०२५ दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या सामानात ६,००० रुपये किमतीची टी.व्ही.एस. स्पोर्ट मोटारसायकल आणि २,००० रुपये किमतीचा टेक्नो कंपनीचा मोबाईल (ज्यामध्ये जिओचे सिमकार्ड होते) यांचा समावेश आहे.
पोलीस आरोपी अकरम शेखचा शोध घेत असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मित्रांच्या विश्वासाचा फायदा घेऊन घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 04-07-2025














