ऑनलाईन टास्कच्या नावाखाली लाखोंची फसवणूक : संगमेश्वरमध्ये सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ

संगमेश्वर: ‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने एका महिलेची तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडी येथे उघडकीस आला आहे. टेलिग्रामवरील एका ग्रुपने टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली हे पैसे उकळले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. निता प्रेमदास गमरे (वय ४६, रा. गोळवली बौद्धवाडी) यांना त्यांच्या मोबाईलवरील टेलिग्राम ॲप्लिकेशनवर ‘वंशिका’ नावाच्या अकाउंटवरून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत मेसेज आला होता. त्यांनी याला होकार दिल्यानंतर, आरोपी क्रमांक ०१ हिनाने (नाव आणि गाव अज्ञात) त्यांना ऑनलाईन काम कसे करायचे याची माहिती दिली.

सौ. गमरे यांनी काम सुरू केल्यानंतर ‘customer support’ नावाच्या टेलिग्राम ग्रुपकडून त्यांना वेळोवेळी टास्क पूर्ण करण्यासाठी आणि पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भरण्यासाठी सांगितले गेले. ‘customer support’ ग्रुपच्या कस्टमर सर्व्हिसने सौ. गमरे यांना मेसेजद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती दिली आणि त्यात पैसे भरण्यास सांगितले.

दिनांक २३ जून २०२५ रोजी सकाळी ९.२४ ते २९ जून २०२५ रोजी सायंकाळी ४.०० या वेळेत सौ. गमरे यांनी त्यांच्या खात्यातून एकूण २,२९,१३२ रुपये या खात्यांमध्ये जमा केले. मात्र, त्यानंतर त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यांनी आरोपी हिना, ‘customer support’ ग्रुपचे ओनर निखिल पाटील, ॲडमिन विध्नेश आणि टाटा क्लिक कंपनीचे सिनिअर प्रमोटर सुमित (सर्वांची पूर्ण नावे व गावे अज्ञात) यांच्याकडे वारंवार पैसे परत करण्याची विनंती केली. परंतु, त्यांना पैसे परत मिळाले नाहीत, उलट आरोपींनी आणखी पैसे भरण्याचा आग्रह धरला.

या प्रकारानंतर सौ. गमरे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.१६ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा क्र. ९१/२०२५ दाखल करण्यात आला आहे. टाटा क्लिक कंपनीचा वापर करून ही फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अशा ‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 04-07-2025