रत्नागिरी : युवक-युवतींसाठी निवासी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

रत्नागिरी : अल्पसंख्याक समुदायातील युवक व युवतींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रशिक्षण देऊन आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुदायातील युवक-युवतींसाठी निवासी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक समुदायातील किमान १२वी उत्तीर्ण युवक-युवतींना तीन महिन्यांच्या कालावधीचे पोलिस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण ‘सेवा सामाजिक विकास संस्थेमार्फत’ देण्यात येणार आहे.

तीन महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत शारीरिक चाचणी, धावणे, गोळाफेक इत्यादींचे प्रशिक्षण उमेदवारांना देण्यात येईल. तसेच सामान्यज्ञान, अंकगणित, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या लेखी परीक्षेतील विषयांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीना देण्यात येईल.

मोफत प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (L.C.), एसएससी, एचएससी/पदवी (गुणपत्रक/प्रमाणपत्र), ३ पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड या कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रतींसह शिर्के प्लाझा, तहसील कार्यालयासमोर, जयस्तंभ, रत्नागिरी येथे अर्ज करावा, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज भांडवलकर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 04/Jul/2025