लांजा : लांजा शहरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हद्दीत असणारी अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग विभागाने पोलिस बंदोबस्तात हटवण्यास सुरवात केली; मात्र प्रशासनाने केलेल्या कारवाईने शहरातील व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरातील व नगरपंचायतीकडे नोंदणीकृत असलेले तब्बल तीनशेच्या जवळपास व्यावसायिक गुरुवारी महामार्ग विभागाने केलेल्या कारवाईत बाधित झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला सुरुवात होऊन पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला; मात्र लांजा शहरामध्ये महामार्गाचे काम अजूनही रखडलेल्या स्थितीमध्ये आहे. शहरातील महामार्ग कामाला गती देण्यासाठी महामार्ग विभागाने पावले उचलली आहेत. महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने शहरात महामार्गावर अतिक्रमण केलेल्यांना सूचनावजा आवाहन केले होते. शहरात महामार्गावरील टपऱ्या, दुकाने व अन्य अतिक्रमणे ३ जुलैपर्यंत व्यावसायिकांनी स्वतःहून हटवावीत, असे आवाहन केले होते.
गटाराच्या बाहेर पाच ते सहा फूट असून, पुलाखालील असणारी सर्व प्रकारांची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित सर्व टपरी, दुकाने, स्टॉलचालक यांनी देण्यात आलेल्या कालावधीत सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवावीत. अन्यथा, महामार्ग प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्तामध्ये सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. यासह अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सूचना महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी (ता. ३) महामार्ग प्राधिकरण विभागाने कडक पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. दिवसभर ही मोहीम सुरू होती. बाजारपेठेत सर्वत्र पोलिस बंदोबस्त असल्याने शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते
ठाकरे सेनेच्या भूमिकेकडे लक्ष
छोटे-मोठे व्यावसायिक बाधित होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, याकरिता महाराष्ट्र समर्थ फेरीवाला विक्रेता संघटना यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पाठिंबा देऊन प्रशासनाच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला होता. मात्र, कारवाई होताच संबंधित प्रशासन आणि बाधित व्यावसायिक, उबाठा शिवसेना यांच्यामध्ये वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महामार्ग विभागाने कारवाई केली; त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 04/Jul/2025














