आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : विधासभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. त्याचबरोबर मतदान वाढीसाठी सर्वांनी मतदान करावे, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

सर्व नोडल अधिकाऱ्यांची जिल्हा नियोजन समिती सभागृहात मंगळवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलिस अधीक्षक धनंजय मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी जिल्हाधिकारी एम. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला जाईल. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकांनी आपले मतदान करावे. भरारी पथकं सक्रीय ठेवा. दिवाळी मोठा सण असल्याने अधिक सतर्क बाळगून काटेकोरपणे वाहनांची तपासणी करावी. गोवा बनावटीचे मद्य, नियमापेक्षा रोखड याबाबतीत पहिल्या दिवसापासून काटेकोरपणे तपासणी करावी. भरारी पथक, सिमा भागातील तपासणी नाके या ठिकाणी सीसीटिव्ही बसवावेत.

पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. घाट मार्गातील सीमा भागात तपासणी पथकांमध्ये राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग, जीएसटी विभागाचे प्रतिनिधी असावेत. तपासणी नाक्यांपासून काही अंतरावर यु टर्न घेऊन माघारी वळणाऱ्या वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करत सविस्तर माहिती दिली. आचारसंहितेत काय करावे, काय करु नये, विविध नोडल अधिकारी कार्य, कर्तव्य, जबाबदारी यांचा यात समावेश होता. बैठकीला विविध नोडल अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 16-10-2024