मंडणगड नगररचना विभागाकडून प्रारूप आराखड्याबाबत मार्गदर्शन

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीचे शहरातील जमीन वापराचे निर्धारण करण्याकरिता तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्याची नागरिकांना माहिती देण्यासाठी नगररचना विभागाच्या सहायक संचालिका स्मिता कलकुटकी यांनी २ जुलै रोजी मंडणगड नगरपंचायत कार्यालयास भेट दिली. नगरपंचायत हद्दीत जागेच्या विनियोगासंदर्भात आराखड्यात निश्चित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या झोनची माहिती दिली. याचबरोबर आरक्षण पडून जागा अधिगृहीत करण्याची वेळ आल्यास नागरिकांना मिळणारे फायदे व या संदर्भातील शासनाच्या धोरणाची विस्ताराने माहिती दिली. नगरपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना आराखड्याबद्दल माहिती दिली.

यावेळी मुख्याधिकारी अभिजित कुंभार, मंडळ अधिकारी नीलेश गोडगासे, तलाठी मंदार गावकर, रत्नागिरी नगररचना कार्यालयाचे कदम, महसूल विभाग, भूमिअभिलेख व मंडणगड नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. सभेस उपस्थित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आराखड्यासंदर्भात नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. नगररचना विभागाच्या सहायक संचालिका स्मिता कलकुटकी यांनी शहराच्या विकासाकरिता नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर आरक्षणासंदर्भात नागरिकांनी आपल्या तक्रारी व हरकती नियोजन समितीकडे लिखित स्वरूपात नोंदवणे आवश्यक असल्याचे सांगितले. नियोजन समिती गरजेनुसार आराखड्यात बदल करणार असल्याचे स्पष्ट केले. आराखड्यासंदर्भातील सुनावणीच्यावेळी हरकतींची सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सभेत नागरिकांनी आपले आक्षेप आणि हरकतीसंदर्भात म्हणणे मांडले.

या सभेस उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक विनोद जाधव, आदेश मर्चेंडे, नीलेश सापटे, सुभाष सापटे, नगरसेविका प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, रेश्मा मर्चडे, प्रवीण जाधव, माजी जि. प. अध्यक्ष संतोष गोवळे, ग्रामस्थ सचिन शेठ, श्रीपाद कोकाटे, कमलेश शिगवण, राजेश पारेख, शांताराम भेकत, भाऊसाहेब कलमकर, सौरभ लेंढे, साईराज सावंत, यशपाल बोलाडे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 04/Jul/2025