◼️ जास्तीत जास्त विठ्ठलभक्तांनी पारंपरिक वेशात सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी : प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून रविवार, दिनांक ६ जुलै रोजी रत्नागिरी शहरात आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या विठ्ठलभक्तांना पंढरपूरपर्यंत वारीला जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी विठ्ठलचरणी सेवा रुजू व्हावी या उदात्त हेतूने गेली काही वर्षांपासून ‘शक्तिमंदिर ते भक्तीमंदिर’ या संकल्पनेने या वारीचे आयोजन केले जात आहे.
या वारीची सुरुवात रत्नागिरीतील सुप्रसिद्ध मारुती मंदिर म्हणजेच ‘शक्तिमंदिर’ येथून होईल, तर सांगता प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या येथील विठ्ठल मंदिर अर्थात ‘भक्तीमंदिर’ येथे होणार आहे. रविवार, ६ जुलै रोजी सकाळी ६:३० वाजता मारुती मंदिरातून वारीला प्रारंभ होईल. या वारीदरम्यान विठ्ठलभक्तांना रिंगणाचा आनंद देखील घेता येणार आहे.
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥” या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त विठ्ठलभक्तांनी या वारीमध्ये पारंपरिक वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या ॲड. रुची महाजनी यांनी केले आहे. पंढरपूरच्या वारीचा अनुभव रत्नागिरीत घेण्याची ही संधी असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 04-07-2025









