चिपळूण : टाळमृदंगाच्या गजरात चिपळूण व खेड तालुक्यातील दीड हजार वारकरी आपाड़ी एकादशीसाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
चिपळूणमधून कोकण दिंडी समाजातर्फे पंढरपूरला दिंडी जाते. यात बाल वारकऱ्यांसह महिलांची संख्याही लक्षणीय असते. कोकण दिंडी पायी वारीला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे तसेच परशुराम इथून निघणाऱ्या राजेश शिर्के घराण्याच्या कोकण दिंडीला १७६ वर्षाची परंपरा आहे याशिवाय तालुक्यातील हजारो वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. चिपळूण आगाराकडून यावर्षी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
काही वारकरी टेंपो आणि खासगी वाहनातून दिंडीत सहभागी झाले आहेत. कोकण दिंडीचा पोफळीतील मानकरवाडीत कोकणातील शेवटचा मुक्काम असतो. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर त्याचबरोबर आणलेल्या ट्रकमध्येच साहित्य असते. ठराविक मुक्कामी पोहोचल्यावर वारकरी खाण्या-पिण्याची तयारी करतात. शनिवारी सर्व संतांच्या पालख्या वाखरी येथून पंढरपूरला जाणार आहेत. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी अनेक जण गुरुवारी, शुक्रवारी पंढरपूरला जाणार आहेत. पंढरपूरमधील भक्तनिवास आणि धर्मशाळेत त्यांचा मुक्काम असेल, चिपळूण, गुहागर आणि खेड तालुक्यांतील भक्तांसाठी ३५ नंबरची जागा आरक्षित असणार आहे. हे सर्व भाविक सोमवारी (ता. ७) परतीचा प्रवास करणार आहेत.
कसा असतो दिनक्रम
वारकऱ्यांच्या दिनक्रमाबाबत माहिती देताना लोटे येथील कीर्तनकार शैलेश आंब्रे म्हणाले, वारकऱ्यांच्या जेवणाची वेळ ठरलेली असते. सकाळी काकड आरती आणि न्याहारीनंतर ते चालण्यास सुरुवात करतात. दुपारी वाटेत विसावा घेऊन किंवा मुक्कामाच्या ठिकाणी भोजन करतात. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन झाल्यावर जेवणाची सोय असते. अन्न-औषध प्रशासन वारीतील अन्न आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठीही कार्यरत असते, जेणेकरून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 04/Jul/2025














