रत्नागिरी : जिल्हा योजनेच्या निधीमधून सर्व तालुक्यांना न्याय द्या – डॉ. विनय नातू

खेड : रत्नागिरी जिल्ह्यामधील जिल्हा वार्षिक योजनेतील निधीमधून सर्व तालुक्यांना योग्य निधी देऊन न्याय द्या, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे तसेच तालुकानिहाय पाच विभागांची विगतवारही त्यांच्याकडे सादर केली आहे. भाजपच्या नेत्यांकडूनच अशी मागणी करण्यात आल्यामुळे जिल्ह्याच्या महायुतीत समन्वय नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विभागामधून तालुकानिहाय मंजूर झालेली प्रशासकीय मान्यता, मिळालेल्या कामांची संख्या व निधीची रक्कम याची माहिती चार विभागांमध्ये माजी आमदार नातू यांनी निदर्शनास आणली आहे. त्यामध्ये काही ठराविक तालुक्यामध्ये बांधकामांची कामे अधिक प्रमाणात मंजूर केली जात आहेत. त्यामुळे अन्य तालुक्यांमध्ये कामांचा अनुशेष वाढत आहे. त्यामुळे त्या भागातील कामांना न्याय मिळत नाही.

२०२४-२५ मध्ये विविध विभागांना मिळालेली प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांच्या २१ कामांना १ कोटी ५७ लाख इतकी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यात चिपळूण ४२ लाख, गुहागर ३ लाख, संगमेश्वर ५ लाख, रत्नागिरी ७६ लाख व राजापूर तालुक्याला ३१ लाख मंजूर झाले असून, यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, व लांजा तालुक्यांना एक रुपयाचाही निधी मंजूर नाही.

तालुकानिहाय वाढणाऱ्या अनुशेषाची नियोजन विभागाकडून आवश्यक ती तपासणी करून सर्व तालुक्यांकरिता निधीचे वितरण होईल या दृष्टीने वित्त व नियोजन विभागाने लक्ष द्यावे. याबाबत सखोल चौकशी करून सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांकडून नियोजन समितीचा सर्व कार्यभार तपासावा, अशी विनंतीही नातू यांनी पत्राद्वारे केली आहे.

जिल्हा नियोजनाच्या निधी वितरणातील असमतोल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्यापुढे मांडलेला आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे त्यावर पुढील काही दिवसांत कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे- विनय नातू, माजी आमदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 04/Jul/2025