रत्नागिरी : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांना पकडण्याची मोहीम रत्नागिरी नगर परिषदेने हाती घेतली असून, आतापर्यंत ६५ हून अधिक गुरे पकडण्यात आली आहेत. मात्र, या गुरांच्या वाढत्या संख्येमुळे पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. चंपक मैदानातील निवारा शेडमध्ये ही गुरे ठेवली असून, त्यांच्या देखभालीसाठी पालिका कर्मचाऱ्यांच्या पदरी मोठा खर्च पडत आहे.
वाढता खर्च आणि अपुरी जागा
पकडण्यात आलेल्या गुरांच्या देखभालीसाठी पालिकेचे ४ कर्मचारी २४ तास साफसफाई, चारापाणी यासाठी राबत आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची नियमित तपासणीही केली जात आहे. एका गुराला दिवसाला १५० रुपये पेंढ्यांचा खर्च येतो. या हिशोबाने ६५ गुरांसाठी पालिकेला दररोज सुमारे पावणेदहा हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. गुरांची संख्या वाढत असल्याने चंपक मैदानातील निवारा शेडही अपुरी पडू लागली आहे.
मालक नसलेल्या गुरांचा भार पालिकेवर
शहरात मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू असल्याने कळपाने फिरणाऱ्या या गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यापूर्वी पालिकेकडे कोंडवाडा नसल्याने आणि गुरांना जास्तीत जास्त तीन दिवसच ठेवण्याची मर्यादा असल्याने मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता पकडलेल्या अनेक गुरांना मालकच नसल्याने त्यांचा सर्व भार पालिकेवर येऊन पडला आहे.
माध्यमे आणि राजकीय पक्षांनी या प्रश्नावर आवाज उचलल्यानंतर पालिकेने मोकाट गुरांना पकडण्यास सुरुवात केली. गेल्या दोन-तीन दिवसांत ६५ गुरे पकडण्यात आली आहेत. या गुरांचे पुढे काय करायचे, हा प्रश्न अनुत्तरित असल्याने, ‘मोकाट गुरे सांभाळणे म्हणजे नाकापेक्षा मोती जड’ अशी अवस्था पालिकेची झाली आहे, असे दिसून येत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 04-07-2025














