मुंबई, ता. ३ : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि वाळूची वाढती गरज लक्षात घेता, आता उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक २४ तास करता येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. सध्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच वाळू उत्खननाची परवानगी आहे, मात्र या नव्या निर्णयामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य वापर होऊन अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महाखनिज पोर्टलवरून २४ तास ‘ईटीपी’ सुविधा
वाहतुकीच्या पारदर्शकतेसाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. ‘महाखनिज’ पोर्टलवरून आता २४ तास ‘ईटीपी’ (Electronic Transit Pass) तयार करता येणार आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक न करता येण्याची समस्या दूर होणार आहे.
वाहतुकीच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे निर्णय:
प्रत्येक वाळू घाटाचे ‘जिओ-फेन्सिंग’ केले जाईल.
घाट आणि वाहतुकीच्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील.
वाळू वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना ‘जीपीएस’ (GPS) उपकरणे अनिवार्य करण्यात येणार आहेत.
या उपाययोजनांमुळे वाळू वाहतुकीतील अनियमितता कमी होऊन ती अधिक पारदर्शक होईल, अशी अपेक्षा आहे.
राज्यात लवकरच कृत्रिम वाळू धोरण लागू; ५० क्रशर केंद्रे उभारणार
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी कृत्रिम वाळूच्या धोरणावर चर्चा करण्याची मागणी केली. यावर बोलताना महसूलमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात नैसर्गिक वाळूच्या मर्यादेमुळे सरकारने कृत्रिम वाळू धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० क्रशर केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक केंद्राला पाच एकर जमीन उपलब्ध करून दिली जाईल. पुढील तीन महिन्यांत राज्यात एक हजार क्रशर केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम प्रकल्पांना मोठा दिलासा मिळणार असून, वाळूची उपलब्धता वाढून प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 04/Jul/2025














